मी हा ब्लॉग २०१० मध्ये सुरू केला. तेव्हा त्याचं नाव स्वच्छंदी असं होतं. आणि मग २०१५ मध्ये याचं नाव सात्मन् असं बदललं. ह्या ब्लॉग वर शेवटची पोस्ट २०१६ मध्ये लिहिली आहे. आणि आज आपण २०१९ मध्ये आहोत. ह्या १० वर्षांच्या कालावधीत काय काय झाले ह्याचा हा धांडोळा!
[Read this post in English: My journey through my blog]
२०१० मध्ये मला "व्यक्त" व्हायचे होते. त्यासाठी मी हा ब्लॉग स्वच्छंदी या नावाने सुरु केला. काही वर्षांनी माझ्या असं लक्षात आलं की मी काही स्वच्छंदी वगैरे नाहीये. स्वच्छंदी ही फारच युटोपियन संकल्पना आहे. स्वच्छंदी आयुष्य हे फक्त 'ठरलं आणि झालं' असं मिळवता येत नाही. जून २०१० मध्ये मी माझ्या अभियांत्रिकी कॉलेजच्या प्रवेशाची वाट बघत होते. मी बारावीमध्ये जास्त काही अभ्यास केला नाही. तेव्हा मी थोडेफार यमक जुळवून "कविता" लिहायचे. लोकं कॉमेंट्स वगैरे करायचे. त्यामुळेच कदाचित २०१०-११ मध्ये सगळ्यात जास्त पोस्ट्स लिहिले गेले.
२०१० मध्ये माझं इंजिनिअरिंगचं कॉलेज सुरू झालं खारघरला! वाढलेला प्रवास, नवीन वातावरण आणि नवीन मित्र-मैत्रिणी ह्यात कुठेतरी मला माझा सूर सापडू लागला. २०१२ च्या अखेरीस माझं पोस्ट्स लिहिणं थांबलं.
मी २०१४ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करायला लागले. स्वतःचे पैसे स्वतः खर्च करू लागले. पैसे साठवू देखील लागले. स्वतःच्या आयुष्यावरचा अधिकार कुठेतरी वाढत गेला. हळूहळू स्वच्छंदी ह्या ओळखीतला फोलपणा लक्षात येऊ लागला. तो एक एस्केप होता! २०१५ मध्ये मी ह्या ब्लॉग चं रंगरूप बदललं आणि नाव बदलून सात्मन् असं केलं. स्वतःला आत्मसात करायचा एक प्रयत्न!
माझ्या आयुष्याचा आलेख हा मी ह्या ब्लॉगच्या पोस्ट्स सोबत मांडू शकते. उधार घेतलेली ओळख, त्या ओळखीच्या विरोधात चाललेला आंतरिक संघर्ष, स्वीकारलेले अपयश आणि मग त्यातून घेतलेली भरारी!
त्यानंतर मी इंस्टाग्राम आणि फेसबुक वर अधिक व्यक्त झाले. खूप सारे फोटो टाकले आणि लांब लांब कॅप्शन लिहिले. बरेचसे लोक फॉलो करू लागले. २०१७ मध्ये नोकरी सोडून ५ महिने फिरायला गेले. नेपाळ, बाली, व्हिएतनाम आणि भारत फिरले. खूप काही बघितलं; नवीन जागा, व्यक्ती आणि वल्ली सुद्धा! ८ महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा काम करायला लागले. आता पुन्हा मी २०२० मध्ये फिरायची स्वप्न बघतेय!
हेच ते स्वच्छंदी म्हणतात ते का?
- सात्मन्
- जून २०१०: नक्की का आलेय मी इथे...???
- ऑक्टोबर २०१५: स्वच्छंदी ते सात्मन्
- मार्च २०१८: Oct 2017 – Mar 2018 : Recap of past 6 months
Comments