"त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरं-पोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र सुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :)
शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :)
आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू!
म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार याचा तो आनंद होता... आणि सिनेमा पाहिल्यावर तर त्या आनंदाने परिसीमा ओलांडली. सिनेमाची एकेक फ्रेम जशी पुढे सरकत होती तसं काही ना काही सापडत होतं. खूप साऱ्या गोष्टी आठवत होत्या, मनातील खूप सारे भाव मुक्त होत होते. कुठेतरी मन विचार करत होतं की आपण नववीत असताना असेच होतो का??? आपणही अशीच मजा करायचो का??? आणि केली असली तरी ती इतकी निरागस होती का? म्हणजे बघा ना, तो काळ आहे अंदाजे ७५ सालचा, जेव्हा देशावर आणीबाणी लादलेली होती. त्या काळातील ही ईयत्ता नववी मध्ये 'नववी ब' मध्ये (मी नववी ब मध्ये होते ना, मेन्शन तर झालंच पाहिजे :P ) शिकणारी मुलं! त्यांचे ते ऐन तारुण्यातील अनुभव, खरंतर धांदल! कुठेतरी प्रत्येकाने अनुभवलेलं... पण आजही ते तेवढंच निरागस आहे का हा प्रश्न मात्र सतावतो मला! आज कुठे आपल्याला एवढा वेळ असतो की आपण त्याच्याकडे किंवा तिच्याकडे असे कटाक्ष टाकणार आणि मग त्या व्यक्तीच्या नजरेत काहीतरी शोधायचा प्रयत्न करणार. अबोल भावनांचा अर्थ लावणार आणि मग त्या आठवणींत जगायचा प्रयत्न करणार. चिठ्ठी लिहिणार! या सर्व गोष्टी नाही म्हटल्या तरी हद्दपार होताहेत, मुलं लवकर 'मोठी' होतात सध्या, असं आपलं सगळे म्हणतात, आणि काही अंशी ते खरंदेखील आहे... असो!
सिनेमा सुरु झाल्यावर सर्वात आधी लक्षात येते ते सिनेमाचे छायाचित्रण! एक विपुल निसर्ग सौंदर्य लाभलेलं टुमदार गाव, त्या गावची शाळा, देउळ! सगळं एवढ्या एस्थेटिकली दाखवलंय कि त्याला खरंच तोड नाहीये... दुसरी गोष्ट म्हणजे पात्र निवड! प्रत्येक कलाकाराने त्याच्या भूमिकेला अपेक्षित असेच काम केलेले आहे. जोश्याची कटकट करणारी ताई, सदैव काळजी करणारी आई आणि समजून घेणारे बाबा! इतिहास, भूगोलाचे मांजरेकर सर आणि 'यो' मामा! (जितु!!!) सगळेच अगदी चपखल! सिनेमा बराच वेगवान आहे, पण त्यायोगे अवघ्या पावणेदोन तासात कादंबरीतील बऱ्याच गोष्टी दिग्दर्शकाने दाखवल्या आहेत. जे अर्थात स्वागतार्ह आहे. परंतु कळस हा आहे की, संपूर्ण सिनेमाभर एक निरागसता दाटून राहिलीये, त्या निरागसतेच्या छायेतच आपण हसतो, खिदळतो, शिट्टी मारण्यास धजावतो,लाजतो आणि प्रसंगी गहिवरून देखील जातो... आणि याचे संपूर्ण श्रेय दिग्दर्शकाचेच आहे. सगळंच कसं अगदी तरल...
हा सिनेमा पाहिल्यावर उगाचच कुठेतरी ती 'निरागस'वाली स्ट्रीक जागी झाल्यासारखी झाली. मग उगाचच कोणी एखादा कटाक्ष टाकतोय का, हे पाहण्यासाठी डोळे भिरभिरायला लागले. आपण कोणावर तरी 'लाईन' मारावी असंदेखील वाटलं... :D आणि हे असं सगळं वाटण्याचं संपूर्ण श्रेय शाळा च्या कलाकारांना जातं. प्रत्येकाने एवढा सहज अभिनय केलाय, की आपण विसरून जातो, आपण एक सिनेमा पाहतोय. सगळं अगदी आपल्या डोळ्यांसमोर घडतंय असंच वाटायला लागतं. जोश्याची बोलण्याची ढब आणि शिरोडकरचे सौंदर्य पार गुंतवून टाकतं आपलं मन! तिच्या त्या दोन वेण्यांत माळलेली फुलं असोत वा तिचा आवाज, सगळ्यात सौंदर्य ठासून भरलेलं... आणि आपण त्याचा आस्वाद घेत राहतो. त्यांनी एकमेकांकडे टाकलेले कटाक्ष आणि त्यायोगे त्याचं झालेलं बोलणं जणू आपण ऐकतोय असं वाटायला लागतं. तिचं प्रत्येकवेळी मागे वळून पाहणं, गालात हसणं, डोळ्यांनीच मंजुरी देणं, सगळंच मन:पटलावर कोरलं गेलंय... कुठेतरी प्रत्येक क्षणी जोशी आणि शिरोडकर आपल्याला प्रेमात पाडतात... अगदी नकळत! हे सर्व चालू असताना काळजाला भिडणारं पार्श्वसंगीत आपल्याला साथ देतं आणि 'आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसारखे मुक्त होतो...'
Comments
तुम्हाला जर असे वाटत असेल कि जर तुम्ही काहीतरी लिहु शकता उदा- एखादा लेख अथवा विनोद अथवा एखादी कविता किवा एकदा विनोदी फोटो काढू शकत असाल म्हणजेच कोणतेही कलागुण तुमच्यामध्ये असतील तर आम्ही तुमच्याच शोधात आहोत. तुम्ही आपले कलागुण डिजिटल मराठी वाचनालयाच्या पटलावर मांडू शकता तेही अगदी मोफत.
अधिक माहितीसाठी हे पहा
http://dyankosh.blogspot.com/p/blog-page_9730.html
नक्की बघेन...
Khup khup shubhechha!!{manatun ….manalisathi……..}
गीतांजली : लवकरात लवकर योग जुळवून आणा! :)
सुहास : लवकर पहा...:)
विक्रम : धन्यवाद! मनापासून! :D
आमच्याही...
http://majhyamanatalekaahee.blogspot.in/2012/01/blog-post_23.html
"SHALA" kadambari ani movie donhich apratim aahet...
Ani ha lekh hi farach sunder lihilye...(sarve samavishte... lahan sahan gosti mast observe kelya aahet...) keep it up...