आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून असेल...
हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे!
सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर!
पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं?
स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चालत असेल, तर ती युक्ती शोधावी तरी कुठे! व्यक्ती तशा प्रकृती म्हणतात, त्याप्रमाणे व्यक्ती तशा युक्ती असतील ना जगात... पण त्यातली आपली ती कोणती???
ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं खरंच अस्तित्वात आहेत का? असतील तर ती मला कुठे सापडतील आणि नसतील तर हा सर्व खटाटोप तरी का करा! यातून मिळणार ते काय! बरेचसे प्रश्न अनुत्तरीत राहणार आणि या अनुत्तरीततेत लपलेलं अपूर्णत्व आणि असमाधान डोकं वर काढणार आणि चक्र पुन्हा सुरु होणार... समाधानतेकडे आणि सुखाकडे वाटचाल करायला आपण सुरुवात करणार आणि कितीही काही झाले तरी मिळवायचेच अशी ईर्षा निर्माण होणार...
आपण त्या चक्रात गोल-गोल फिरत राहणार... भूतकाळ पाठी सारून भविष्याकडे वाटचाल करत राहणार... रिकाम्या हाताने! हात धरणारे बरेच येतील, परंतु हात भरणारे फार कमी...! त्यांना जपणं शिकायला हवं... त्यासोबत समोरच्याचा हात भरणं देखील जमलं पाहिजे... एकमेकांचे हात भरून एक पूर्णत्व येईल, परंतु भरलेले हात धरू शकत नाही याचं असमाधान देखील...!
असो!
आपण निव्वळ चक्रात गोल-गोल फिरायचं असतं आणि बस्स आयुष्यात पुढे जायचं असतं...!- सात्मन्
Comments
आपण निव्वळ चक्रात गोल-गोल फ़िरायचं असतं आणि बस्स आयुष्यात पुढे जायचं असतं
सौ टका :)
@ bharatiya : dhanyawaad!
थोडा जास्त विचार करण्याच्या परिणाम असेल कदाचित.
जे पण वाटतेय ते योग्यच आहे , काही गोष्टी घडतात rather त्या घडु द्यायच्या असतात. आयुष्य पुढे जाण्यासाठी त्याच गोष्टी मदत करतात
मेजवानी देत राहा.
माझ्या ब्लॉगला भेट द्या आणी आवडला तर फॉलो करायला विसरू नका..!!
InfoBulb : Knowledge Is Supreme
इन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे
टिपण्णीस परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद..!!