Skip to main content

मला 'लंप्या' का आवडतो...


तर माझी आणि लंप्या ची ओळख काही फार जुनी नाही. नुकतीच पंधरा दिवसांपूर्वीची आहे. एका मैत्रिणीने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. तसा तो आहे माझ्यापेक्षा लहान पण त्याच्यावर लगेच जीव जडला. तो आवडण्याची तशी खूप सारी कारणे आहेत, त्यातली काही आज तुम्हाला सांगायाचीयेत, बाकीची 'टॉप सिक्रेट'!

१. त्याची ओब्झर्वेशंस : त्याला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींत जग दिसतं. प्रत्येक पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवर विचार हा त्याला करायलाच हवा. त्यातून, स्वत:चे असे, काही 'मॅड'सारखे अंदाज बांधायचे आणि मग बाकी संपूर्ण जग कसं 'मॅड' आहे, हे ठरवायचं.

२. त्याचं आपल्या लोकांवर असणारं प्रेम : तो खरंतर राहतो आजी-आजोबांकडे, म्हणजे आई-बाबा, भाऊ-बहिणी यांच्यापासून दूर. त्याला नेहमी त्याच्या घरच्यांची आठवण सतावत असते. मधेच त्याला आपण त्या सगळ्यांपासून, विशेषत: आईपासून दूर जात आहोत अशी भीती देखील वाटत असते. मग तो त्यांच्या आठवणी जागवायला सुरुवात करतो आणि नकळत एक अदृश्य बंध दाखवतो, ज्याने तो घरच्यांशी बांधला गेलेला आहे. आणि आपल्याला अशी पक्की खात्री करून देतो कि तो कधीच त्यांच्यापासून तुटणार नाही.

३. त्याची शाळा : लंप्या त्याच्या गावातल्या एका छोट्याशा शाळेत जातो. त्याची आई देखील त्याच शाळेत होती. त्यामुळे कदाचित त्याला शाळा खूप जवळची वाटते! त्याला गायनात आणि चित्रकलेत विशेष रस आहे. त्याची शाळा त्याला या दोन्ही बाबतीत खूप प्रोत्साहन देते. प्लस त्याचे शाळेतले मित्र! जे अगदी त्याच्यासारखेच 'मॅड' आहेत.

४. त्याची व्यक्त होण्याची पद्धत : विशेषत: बोलण्याची ढब! त्याचा बोलण्यात एवढी निरागसता आहे कि काय सांगू. तो त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक विचित्र गोष्टीला 'मॅड' मानतो. मग ती त्याची भातुकलीत खोटा खोटा चहा बनवून देणारी बहीण असो वा काही सुचत नसताना खोलीत येरझाऱ्या मारणारे आजोबा असोत, त्याला हे सर्वच 'मॅड' वाटतात! अगदी निर्जीव वस्तूसुद्धा! आणि तो नेहमी 'एकोणवीसशे' वेळा विचार करतो बरं का!

५. त्याची मैत्रीण सुमी : या सुमीची आठवण जरी आली, तरी त्याच्या पोटात काहीतरी गडबड होते. ही सुमी त्याच्याशी कधी कधी खूप चांगली वागते, तर कधी कधी उगाचच त्याच्यावर रागवत असते. त्यामुळे त्याच्या दृष्टीने तर ती अगदीच 'मॅड' आहे! 

तर असा हा 'मॅड' लंप्या आणि त्याचा म्हणजे अगदी त्याचाच 'मॅडनेस'!!!

सौजन्य : बुकगंगा 


ता.क. : तर बऱ्याच जणांना आतापर्यंत कळले असेल  कि हे लंप्या काय प्रकरण आहे, परंतु कदाचित अशाही काही व्यक्ती असतील ज्या अजून लम्प्याला ओळखत नसतील, त्यांच्यासाठी :
लंप्या हा 'प्रकाश नारायण संत' यांच्या 'वनवास' या कथासंग्रहाचा 'मॅड'सा हिरो आहे, जो त्याच्या विचारांची असंख्य आंदोलने आपल्याला सहज तितक्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय. या सर्व प्रक्रियेला आपण एक प्रकारचा 'मॅडनेस' म्हटलंत तरी चालेल!!! 
तर मला 'लंप्या' आवडण्याची ही काही कारणं आहेत, तुम्हालाही तो आवडेल अशी आशा! तरी तुम्हाला त्याच्याबद्दल नक्की काय आवडतं, हे प्रतिक्रियांद्वारे जरूर कळवा!

ता. ता. क. : पुस्तकाच्या मुखपृष्टाचा शोध घेता घेता लंप्या बद्दल अजून मॅड पोस्ट सापडली, जरूर वाचा : http://mansvi.blogspot.com/2011/03/blog-post.html


- मनाली
            

Comments

एकदम मॅडसारखं लिहिलंय पुस्तक...मॅडसारखं एका बैठकीत वाचलं होतं :) :) :)
Manali Satam said…
मी पण! सध्या 'शारदा संगीत' हाती घ्यायच्या आधी जरा ब्रेक घेतलाय, मग पुन्हा!!!
Anonymous said…
एक मॅड अजून ह्या मॅडला ओळखत नव्हता ... जो परिचय करून दिल्यावर त्यावरून तरी १०० % आवडणार अस वाटतेय... लवकरच घेतो वाचायला...
रश्मी said…
एय मनाली....मनापासून आभार... :) :) खरं सांगू, तर मी सर्वांत प्रथम लंपनचं पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा मला जे वाटलं तेच तू तंतोतंत उतरवलंयस तुझ्या लिखाणात... मस्त...खरंच. साधं, सोपं आणि सुटसुटीत...!!!
Manali Satam said…
@ दवबिन्दु : शक्य तितक्या लवकर घ्या वाचायला, आणि मॅड बनून जा...
Manali Satam said…
@ रश्मी : धन्यवाद! खरंतर जेवढी त्याची भाषा साधी आणि सोपी आहे, तेवढाच तो कॉम्प्लेक्स! त्यामुळे जे मनात येईल ते उतरवलं! अगदी मॅड सारखं!
BinaryBandya™ said…
चारीही पुस्तके भारी आहेत. मी हावऱ्यासारखी सगळी वाचून काढली होती आठवडाभरात.
ह्याच पठडीतले अजून एक पुस्तक म्हणजे मिलिंद बोकीलांचे "शाळा"...

लंपन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातली मराठी बोलत असतो ती ऐकायला/वाचायला फार गोड वाटते ..



आणि ब्रेक वगेरे घेऊच नको धडाधड वाचून काढ ...
Manali Satam said…
@BinaryBandya : शाळाही माझं आवडतं पुस्तक आहे, पण ते आता सेकंड फेवरीट झालं! :) आणि हो, मी सुरुवात केलीये वाचायला!!!
Shriraj said…
@ Abhi:D +1
@Manali: पुस्तकाची नोंद घेतलेय...आज बघतो वाचनालयात आहे का... नसेल तर Majestic जिंदाबाद :D
Manali Satam said…
@श्रीराज : कुठूनही घे, पण नक्की वाच!!!
Unique Poet ! said…
खूप उशीरा प्रतिसाद देतोय... !
पण मनाली खूप खूप आभार्स ! :) .. लंपनची ओळख करून दिल्याबद्दल !
हा लेख वाचला नसता तर माहीत नाही लंपनची भेट कधी झाली असती... मी त्या साठी सदैव आभारी असेन.... !:)
Manali Satam said…
My pleasure Unique Poet!
मीही त्या व्यक्तीची खूप खूप आभारी आहे, जिने मला हे पुस्तक वाचायला सांगितलं...!
Jaswandi said…
Manali.. mastay blog tuza khup..
ani about Lampan.. lai goad porga ahe.. mazapan favorite ahe to.. tula toh awadala asel tar "Paddy Clarke ha ha ha" navacha Roddy Doylecha pustak ahe.. te vach.. tepan awdel khup
Manali Satam said…
@Jaswandi : hey jaswandi, so good to see you here! तुझं लिखाण मला जाम म्हणजे जाम आवडतं!!! त्यातही "जब वी मेट ची करीना" अल्टिमेट आहे... गेल्या वर्षभरात दहा वेळा तरी वाचलं असेन मी... प्रत्येक वेळी मी तेवढीच हसत असते! अप्रतिम!
आणि हो, मी तू सांगितलेलं पुस्तक नक्कीच वाचेन...
धन्यवाद! आणि मला खूप आनंद आहे कि तुला माझा ब्लॉग आवडलाय! :) :) :)
Sorry I should have replied you that time itself but better late than never...

Thanks for introducing Lapan to Deven n then to us via Deven...hi post wachyachi rahili hoti...
aata Lampan kadhi wachen mahit naahi pan list war nakki aahe...:)
Manali Satam said…
Aparna : yes, you are absolutely right better late than never... good to see you here... n You are Always Welcome! :)
indraneel said…
वाह.. मराठी पुस्तक मित्र या ब्लॉग साठी लंपन वर लेख लिहिताना तुमचा लेख वाचनात आला. खरंच लंपन ने बऱ्याच लोकांना अगदी मॅड करून सोडलंय. छान वाटलं वाचून. तुम्ही पण माझं विवेचन इथे वाचू शकता http://marathipustakmitra.com/2013/05/06/lampan-vanvaas-prakash-narayan-sant/
Tushar Joshi said…
https://www.facebook.com/NaLihileliPatre या पानावर प्रकाशित होणारी लंप्याला पत्रे हे सदर वाचायला विसरू नकोस. खूपच मज्जा आहे अगदी तंतोतंत, हुच्चमॅड झाल्यासारखे :)

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चा

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ