खुपदा असं होतं की आपण आपल्याच धुंदीत जगत असतो.... स्वत:च्या जगाचे राजे असतो आणि अचानक असा दिवस येतो की काही लोक आपल्या आयुष्यात येतात. आपले मित्र बनतात. आपल्या आयुष्यातील खूप जिव्हाळ्याचा भाग बनून जातात. ज्यांना तोडणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही असे.
पण ही मंडळी सतत काही ना काही कारण काढून आपल्यावर हसतात, आपल्याला कमी दाखवायचा प्रयत्न करतात, अर्थात सर्व मैत्रीच्या नात्याने, एक प्रकारची मजा म्हणून.... जी साधारणत: मित्र-मैत्रिणींमध्ये होताच असते. पण का माहित नाही ती आपल्याला टोचू लागते. उगाच राग देऊन जाते. मग ती आपल्याला म्हणतात की, “ एवढं काय त्यात, मजा-मस्तीत चालत सगळं.....”. आपल्यालाही त्यांचा म्हणणं पटून जातं. खरंच काय चुकीच बोलत असतात ते, आपण एवढा अधिकार त्यांना दिलेला असतो. सगळेच जण आपल्या मित्र-मैत्रिणींना एवढं हक्क देतात, मग आपल्यालाच का लागते ही गोष्ट??? का उगाच अपमानित झाल्यासारखा वाटतं...??? वाटतं की हे कोण आले आपल्याला असं बोलणारे??? त्यांची लायकी तरी आहे का???
मग प्रकरण जेंव्हा “लायकी” या शब्दावर येऊन पोहोचतं तेंव्हा वाटतं खरंच या गोष्टीचा आता गांभीर्याने विचार करायची गरज आहे. नंतर स्वत:ला खूप सारे प्रश्न विचारल्यावर खुपच दाक्कादायक उत्तरं सापडतात.... त्यातला सर्वात महत्त्वाचं उत्तरं असतं, मिजास, गर्व, अहंकार...
स्वत:ला राजा मानताना नकळत आपण इतर सर्वांना प्रजा किंवा आपले सरदार मानायला लागतो, असं वाटायला लागतं की बाकीचे सर्व कोण आहे, आपल्यासारखं या जगात कुणीच नाहीये. आणि आपण कुठेतरी स्वत:ला एका वरच्या स्थानावर नेऊन ठेवतो. हे लक्षात घेताच नाही की जेव्हा आपण त्या वरच्या स्थानावरून पडू तेव्हा आपल्याला खाली झेलायला उभे हेच लोक आहेत. पण मन त्या अहंकारात एव्हढं बुडून गेलं असतं की हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि आपण विना कारण राग करत बसतो. म्हणजे स्वत:बद्दल चांगल्या गोष्टी ऐकायची एवढी सवय लागली असते की एक अगदी लहानशी वाईट गोष्टही खपत नाही, मग भले ती मजेत का ना म्हटली असो. किती वाईट आहे हे!!!
पण अशी आपली चूक कळल्यावर वाटतं, बरं झालं या गोष्टीवर विचार केला.... नाहीतर हे कधी लक्षातच आलं नसतं. आणि मग जे काही समाधान लाभतं, त्याला तोड नाही.
म्हणतात ना आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ असतो. ही मित्रमंडळी कदाचित् आपल्याला जमिनीवर ठेवण्यासाठीच आपल्या आयुष्यात असतात... त्यांच्या त्या असण्याला एक मनापासून दाद.......
“Everybody is Self-centered, it’s just the Radius that Differs…..”
Comments