काही नाती खरंच परिपूर्ण असतात,
सर्वदूर असूनही जवळ भासतात,
दररोज न बोलताही आठवण काढतात,
रक्ताची नसूनही एकमेकांचं जग बनून जातात...
क्वचितच भेटतात,
पण भेटल्यावर धमाल उडवून देतात,
जुन्या आठवणी उगाळून खिदळत बसतात,
आणि पुढील भेटीसाठी आस लाऊन धरतात...
एकमेकांची उणीदुणी काढतात,
एकमेकांच्या जयावर पुन्हा टाळ्या पिटतात,
पूर्वी ओढावलेल्या पराजयावर जरा अश्रू ढाळतात,
आणि जुने बंध पुन्हा एकदा घट्ट करतात...
एकमेकांकडे थोड्याश्या आश्चर्यानेच बघतात,
काहीजण कसे बदलले याचा लेखाजोगा मांडतात,
तर काहीजण अजूनही कसे अगदी तसेच आहेत हे ताडतात,
आणि आपणच आपल्या नात्याचा तोल सांभाळतात...
एकमेकांच्या आठवणीत कायम झुरत असतात,
पण जेव्हा एकमेकांसोबत असतात तेव्हा एकमेकांचीच बनून जातात,
खरंच काही नाती किती परिपूर्ण असतात,
आणि हीच नाती परिपूर्ण मैत्रीचे ठसे पावलोपावली उमटवत असतात....
- मनाली साटम
( ८ ऑगस्ट, २०११ )
Comments