" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ...