तर आज २०११ सालचा शेवटचा दिवस आहे. २०११ माझ्यासाठी तरी बरंच झक्कास वर्ष होतं. खूप साऱ्या निरनिराळ्या आठवणी आहेत या वर्षाच्या. त्यातल्या ५ मनाच्या सर्वात जवळ असलेल्या आठवणी शेअर करतेय. खरंतर यांच्या क्रमावर जाऊ नका. आठवणींमध्ये कसली आलीये तुलना! त्या गोड तर गोड, नाहीतर वाईट तर वाईट! सोयीसाठी या घटना ज्या क्रमाने घडल्यात त्या क्रमाने सांगते. तर.... "वर्ल्डकप" : मार्च महिना तर वर्ल्डकप च्या नशेतच गेला आणि एप्रिल मध्ये वर्ल्डकप आपल्या घरी आला. हो, "आपल्या"च! म्हणजे निदान मला तरी तो माझ्याच घरी आला आहे असं वाटतं होतं. मला खात्री आहे तुम्हालाही तसंच काहीसं वाटलं असेल! तो निव्वळ वर्ल्डकप न राहता एक उत्सव, जल्लोष होता. जसा आपण एखादा सण आपल्या कुटुंब आणि दोस्त मंडळींसोबत साजरा करतो तसा वर्ल्डकप सगळ्यांनी साजरा केला. प्रत्येक मॅचची एक वेगळी आठवण! आणि फायनल तर कळस होता! म्हणजे धोनी ने मारलेला तो सिक्स आणि त्या क्षणी पूर्ण झालेली करोडो लोकांची स्वप्नं... :) नऊ दिवसांचे "मौन" : या वर्षी मी एक खूप महत्त्वाची शिकलेली गोष्ट म्हणजे विपश्यना ! आणि त्यासाठीच मी जव...